Ad will apear here
Next
संवादातून प्रश्नांचा गुंता सोडवणारा राजू
राजू इनामदारकुठल्याही विषयातलं शिक्षण खूप महत्त्वाचं असतंच; मात्र फक्त शिक्षण घेऊन उपयोगाचं नाही, तर त्या व्यक्तीच्या प्रवृत्तीत बदल करायचा असला, तर संवाद जास्त महत्त्वाचा आहे. हेच ओळखून राजू इनामदार हा कार्यकर्ता गेली २५ वर्षं कार्यरत आहे. किशोरवयीन मुलांचं वा प्रौढांचं मानसिक आरोग्य असो, त्यांचे लैंगिकतेचे प्रश्न असोत वा आरोग्याच्या समस्या, त्यांची व्यसनं असोत वा त्यांच्या मनात उडणारा समतेविषयीचा गोंधळ, अशा वेगवेगळ्या प्रश्नांना सोडवण्यासाठी राजू संवादकाचं काम करतोय. तेच जगण्याचं ध्येय असलेल्या राजूबद्दल वाचू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात...
............

किसी की मुस्कुराहटों पे हो निसार
किसी का दर्द मिल सके तो ले उधार
किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार
जीना इसी का नाम है...

कवी शैलेंद्र यांचं हे गीत, अनेकदा ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावंसं वाटतं; मात्र काही लोक हे शब्द, या भावना आपल्या आयुष्याचं ध्येय बनवतात. हे गाणं त्यांच्या रक्तारक्तात भिनलेलं दिसतं. असाच एक तरुण मला काही वर्षांपूर्वी भेटला. त्याचं नाव राजू इनामदार!

पुण्याजवळच्या पुरंदरमधलं परिंचे नावाचं एक छोटंसं गाव! त्या गावात राजूचा जन्म एका सर्वसामान्य मुस्लिम कुटुंबात झाला. आईचा बांगड्या विकण्याचा व्यवसाय, तर वडील सायकल दुरुस्तीचं दुकान चालवत. राजूला एक बहीण आणि एक भाऊ. राजूचे आई-वडील निरक्षर असले, तरी त्यांना शिक्षणाचं महत्त्व कळलेलं होतं. शिक्षणानं आपली परिस्थिती बदलेल, मुलं आपल्या पायावर स्वतंत्रपणे उभी राहतील, या भावनेतून त्यांनी आपल्या तिन्ही मुलांना रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत घातलं. राजू आणि त्याची भावंडं पुढे पदवीधर झाली. गावातून पदवीधर झालेली ही पहिलीच मुलं होती. 



गावातलं वातावरण एकोप्याचं होतं; मात्र ज्या काही रूढी-परंपरा होत्या, त्या आपल्या भल्यासाठीच केल्या गेल्या आहेत, या भावनेतून पाळल्या जात. पिढ्यान् पिढ्या चालत आलंय, ते करायला हवंच, असा विचार त्यामागे असायचा. गावात एका सूफी संताचा दर्गा होता. या दर्ग्यातही अनेक उत्सव साजरे होत आणि अनुषंगाने येणाऱ्या प्रथांचं पालनही केलं जात असे. बारावीपर्यंत शिक्षण होताच राजू सासवडला शिकायला पोहोचला. 

यादरम्यान गावात ‘फाउंडेशन फॉर रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ’ (एफआरसीएच) नावाची आरोग्याच्या संदर्भात काम करणारी एक संस्था दाखल झाली. या संस्थेचे प्रमुख पद्मश्री डॉ. एन. एच. अॅन्टिया हे विख्यात प्लास्टिक सर्जन होते. १९९० साली त्यांना त्यांच्या कुष्ठरोगाच्या कामाबद्दल (रुग्णांवरचे उपचार आणि त्यांचं पुनर्वसन) भारत सरकारनं पद्मश्री देऊन गौरवलं होतं. त्यांनी आरोग्याच्या संदर्भात खूप मोठं काम उभं केलं. गावातले आरोग्याचे प्रश्न स्थानिक पातळीवर सोडवले जावेत, यासाठी त्यांनी गावागावातून ‘आशा’ या आरोग्यसेविका प्रशिक्षित केल्या. हा प्रकल्प इतका यशस्वी झाला, की तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी तो शासनातर्फे पुढे अनेक राज्यांत राबवला. या संस्थेशी राजू जोडला गेला आणि आरोग्य या विषयाशी त्याचा संबंध आला. 



राजूनं लोकसंगीतावरच्या एका स्पर्धेत कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावर पोवाडा रचून गायला होता आणि त्या स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला. त्याच्यातलं हे कौशल्य ओळखून ‘एफआरसीएच’ या संस्थेनं त्याला आपल्या कामात आपल्याबरोबर सहभागी करून घेतलं. राजूनं ‘समता जनजागरण’ नावाचं कलापथक उभारलं. आरोग्याचे प्रश्न या कलापथकातून कसे मांडले जावेत, याचं प्रशिक्षणही राजूनं घेतलं. राजू आणि त्याचे मित्र आरोग्याविषयीचे निरनिराळे प्रश्न समजावून घेऊ लागले आणि त्यावर आधारित नवनवीन पोवाडे रचू लागले. हे पोवाडे गावागावातून सादर केले जाऊ लागले. विशेष म्हणजे राजू आणि त्याचे मित्र आले, की लोकांमध्ये उत्साह संचारल्यासारखे वातावरण होई. राजूनं पोवाड्यातून सांगितलेले विचार त्यांना पटत, आवडत. यातूनच राजूची त्या विषयाबद्दलची जाणीव वाढत गेली. एखादं हिंदी चित्रपटगीत जेव्हा ऐकलं जातं, तेव्हा त्या लोकप्रिय गाण्यातून त्यातले भाव सहजपणे मनाला भिडतात. मग याच गाण्यांच्या चालीवर आपल्या जगण्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांबद्दलची गाणी करून गायली तर, या विचारानं राजूनं अनेक गाणी रचली. त्यामुळे त्याला जो विचार पोहोचवायचा असायचा, तो सहजपणे समोरच्यापर्यंत जाऊ लागला. 



‘एफआरसीएच’ या संस्थेमार्फतच मग अनेक विषयांची ओळख राजूला होऊ लागली. समता म्हणजे काय, विवेकवाद म्हणजे काय, लैंगिकतेचे प्रश्न, भारतीय राज्यघटना म्हणजे काय, लोकशाही म्हणजे काय, या आणि अशा अनेक विषयांचा आसपासच्या घटकांच्या, समाजाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो याबद्दलची माहिती राजूला कळू लागली. अनेक विषयांवरची गाणी त्याच्याकडून रचली जाऊ लागले. मुख्य म्हणजे एकीकडे शिक्षण चालूच होतं; पण दुसरीकडे राजूचा या विषयातला रस दिवसेंदिवस वाढत चालला होता. 



‘एफआरसीएच’ संस्थेचा एक नवा प्रकल्प त्यानंतर सुरू झाला. आता राजूला आरोग्य, पर्यावरण आणि सार्वजनिक स्वच्छता या विषयांवर काम करायचं होतं. हा विषय नऊ ते १४ वर्षांच्या वयोगटातल्या मुलांमध्ये रुजवायचा होता. त्यासाठी या प्रकल्पाचे प्रमुख अरविंद वैद्य आणि वैशाली वैद्य यांच्यासोबत राजू काम करू लागला. या कामाचं प्रशिक्षण घेत असताना जवळजवळ एक वर्ष तो मुंबईत त्यांच्याच घरात, त्यांच्याच कुटुंबाचा भाग म्हणून राहिला. या काळात राजूला आपल्यातली कौशल्यं काय आहेत, उणिवा काय आहेत याची खूप जवळून ओळख झाली. आपण एक चांगले संवादक आहोत हे त्याला समजलं. आपल्याला खूप शिकायला आवडतंय आणि शिकल्यानंतर ते शिकवायला आवडतंय ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. या प्रकल्पात ३० ते ३५ वाड्या राजूनं पिंजून काढल्या. राजू येणार म्हटलं, की मुलं आनंदून जायची. त्यांना राजूचं बोलणं, त्याचं गाणं, त्याचं शिकवणं खूप आवडायचं. 



खरं तर राजू गाणं शिकला असता, तर आज चांगला गायक म्हणून नावारूपाला आला असता. त्यानं नाटकात, अभिनयात आपलं करिअर करायचं ठरवलं असतं, तर त्यातही तो आपलं बस्तान चांगलं बसवू शकला असता; पण याच काळात राजू ध्येयवेड्या माणसांच्या सहवासात आला. डॉ. अनंत फडके, डॉ. मनीषा गुप्ते, डॉ. रमेश अवस्थी, डॉ. मोहन देशपांडे यांचा सहवास त्याला लाभला आणि त्याचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. फक्त स्वतःपुरतं बघण्याचा दृष्टिकोनच त्याच्याकडे राहिला नाही. स्त्रीवादी संघटना, राष्ट्र सेवादल, गरवारे बालभवन अशा अनेक ठिकाणी राजू प्रशिक्षणाला जात राहिला आणि तिथल्या शिबिरांमधून, प्रशिक्षणांमधून शिकत राहिला. आपल्या वैयक्तिक सुखासाठी जगणं आणि व्यापक अशा मानवतावादी दृष्टिकोनातून समाजासाठी झटणं यातला फरक त्याला उमगला होता आणि वैयक्तिक सुखापेक्षा या मार्गावर त्याला चालायचं होतं. 



याच दरम्यान मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेच्या ज्योती म्हापसेकर, प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी आणि पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या संकल्पनेतून ‘जिज्ञासा’ हा प्रकल्प किशोरवयीन मुला-मुलींसाठी आकाराला येत होता. राजू या प्रकल्पाचा पहिला प्रशिक्षक किंवा पहिला संवादक होता. मुंबईच्या महानगरपालिकेच्या शाळांमधून वर्षभर हा प्रकल्प राबवला गेला. लैंगिकता या विषयावर फार मोठं काम या प्रकल्पामुळे झालं आणि पुढे हा प्रकल्प महाराष्ट्रात ठिकठिकाणी राबवला गेला आणि अजूनही राबवला जातोय. 



२००१नंतर अनेक मंडळींनी वेगवेगळ्या कामांत स्वतःला झोकून दिलं. डॉ. मोहन देशपांडे यांनी ‘आरोग्य भान (आभा)’, डॉ. मनीषा गुप्ते यांनी ‘मासूम’, डॉ. अनंत फडके यांनी ‘साथी सेहत’ अशा संस्था निर्माण करून त्याद्वारे आरोग्य या विषयावरचं आपलं काम आणखी जोमानं पुढे नेलं. या सगळ्यांबरोबर राजू जोडलेला होताच; मात्र डॉ. मोहन देशपांडे यांच्या आरोग्य संवादात त्याचा विशेष सहभाग राहिला. कुठल्याही विषयातलं शिक्षण खूप महत्त्वाचं आहे; मात्र फक्त शिक्षण घेऊन उपयोगाचं नाही, तर त्या व्यक्तीच्या प्रवृत्तीत बदल करायचा असला, तर शिक्षण किंवा प्रबोधनापेक्षाही संवाद जास्त महत्त्वाचा आहे, हे राजूनं या काळात ओळखलं होतं. त्यातूनच प्रसिद्ध नाटककार अतुल पेठे यांच्याबरोबर राजूनं नंदुरबार इथल्या आदिवासींबरोबरचा एक प्रकल्प पूर्ण केला. 

संवाद संकल्पनेवर काम करत असताना वेगवेगळे प्रश्न, समस्या हाताळण्यासाठी राजूला यशदा, निरनिराळ्या सरकारी संस्था, संघटना, राष्ट्रसेवा दल, स्त्री मुक्ती संघटना इथून बोलावणी येऊ लागली. त्याच्यातला संवादक लोकांपर्यंत पोहोचू लागला. आजदेखील कधी बीएड कॉलेज, तर कधी एमएसडब्ल्यू कॉलेज, तर कधी वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांमध्ये त्याला बोलावणं येतं.



विशेष म्हणजे राजूनं कधीही पैशांची मनीषा मनात ठेवून काम केलं नाही. समोरचा जे मानधन देईल, त्यावर काम केलं. काही ठिकाणी तर मानधनही दिलं जाऊ शकणार नाही, अशी परिस्थिती असेल, तर त्या ठिकाणी त्यानं मोफतही काम केलं आणि आजही करतोय. जेंडर, लोकशाही, लैंगिकता, विवेकवाद, बालहक्क, संविधान, लोकशाही अशा अनेक विषयांशी तो जोडला गेला आहे. मुलांशी, मोठ्यांशी संवाद साधताना त्यानं आपल्या अनुभवांमधून संवाद साधण्यासाठीची अनेक माध्यमं विकसित केली आहेत. कधी गाणी, कधी नाटक, कधी पथनाट्य, तर कधी पपेट शो अशी माध्यमं तो उपयोगात आणतो. 

अतुल पेठेंसह राजू इनामदार

‘दलपतसिंग येती गावा’ हे माहितीच्या अधिकारावरचं नाट्य राजूनं अतुल पेठेंबरोबर ठिकठिकाणी सादर केलं. माहितीच्या अधिकाराची समज जनमानसात निर्माण होण्यासाठी अनेक ठिकाणी कार्यशाळा घेतल्या. अतुल पेठेंबरोबर ‘सत्यशोधक’ असेल, ‘समाजस्वास्थ’ असेल या सर्वच नाटकांत आणि उपक्रमांत राजू खूप आनंदात भाग घेतो. त्या त्या नाटकातल्या पात्रांना त्यांची भूमिका समजण्याच्या दृष्टीने त्यांच्याशी संवाद साधतो. यातून भूमिकेबद्दल त्यांची सजगता तर वाढतेच, पण त्यातून त्यांचं सामाजिक भानही निर्माण होतं. 



डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येनंतर लगेचच अतुल पेठे आणि राजू इनामदार यांनी ‘रिंगण’ नाटक लिहायला घेतलं. गावोगावी या नाटकाचे प्रयोग केले आणि आताही करताहेत. भारताची राज्यघटना/संविधान काय आहे, हे अहिंसेच्या मार्गानं सांगण्याचं काम ‘रिंगण’ करतं. ठिकठिकाणच्या गावांत तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांना हे नाटक बसवताना राजू मदतही करतो. संपूर्ण महाराष्ट्रभर आपलंच नाव नको, तर अनेक कार्यकर्ते घडले पाहिजेत ही भूमिका त्यानं कायमच ठेवली. अतुल पेठेंबरोबर ‘रिंगणनाट्य’ या पुस्तकाचं राजूनं सहलेखन केलं. 



राजूच्या कामाला आज २५ वर्षं पूर्ण झाली असून, त्याला कॉम्रेड अशोक मनोहर पुरस्कारानं कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हस्ते ‘युवा ऊर्जा गौरव पुरस्कार’ देऊन गौरवलं गेलं. साथी निळू फुले सांस्कृतिक अभिव्यक्ती संस्थेद्वारे राजूला शैलाताई दाभोलकर आणि नागराज मंजुळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. इतकंच नाही, तर त्याच्या परिंचे गावानं त्याच्या कार्याची दखल घेऊन सावता माळी मंडळातर्फे ‘परिंचे भूषण’ हा पुरस्कार देऊन आपलं प्रेम व्यक्त केलं. २८ सप्टेंबर २०१८ रोजी वंचित विकास संस्थेतर्फे राजूला आपुलकी पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. 



कुठलीही अपेक्षा न करता हे काम करत असताना वैयक्तिक स्तरावर, कौटुंबिक स्तरावर आणि सामाजिक स्तरावर अनेक अडचणी येतात; पण राजूनं आतापर्यंत त्यांचा कधीही बाऊ केला नाही. राजूची पत्नी १२ वर्षांपासून व्हीलचेअरवर असून, तीव्र संधिवातानं ती ग्रस्त आहे. मनाला अस्वस्थ करणारे प्रसंग अनेकदा आसपास घडतात. हे काम सोडावं अशी परिस्थितीही अनेकदा निर्माण होते; मात्र या परिस्थितीशी राजू सामना कसा करतो हे बघताना राजूचा सकारात्मक स्वभाव समोरच्याला पुन्हा पुन्हा चकित करतो. 

राजू सतत वाचन करतो. ‘अच्युत गोडबोले आणि दीपा देशमुख लिखित ‘जीनियस’ मालिकेमधल्या ‘गॅलिलिओ’ या वैज्ञानिकावरील पुस्तकात त्यानं प्रतिकूल परिस्थितीशी कसा आणि किती सामना केला; पण आपलं काम अधुरं सोडलं नाही, हे मी पाहिलं. याच तऱ्हेच्या अनेक पुस्तकांमधून मला जगण्याची अफाट ऊर्जा मिळते,’ असं तो म्हणतो. इस्मत चुगताई, सआदत मंटो यांच्यासारख्या माणसांचं जगणं बघितलं, की अंगात नवचैतन्य येतं. आपल्याला भेटलेली माणसं, त्यांचं जगणं हेही आपल्याला खूप आधार देतं, असंही त्याला वाटतं. राजू प्रत्येक धर्माचा आदर करतो; मात्र धर्माच्या नावानं घडणाऱ्या अनिष्ट गोष्टी त्याला मान्य नाहीत. 



सध्या अतुल पेठे आणि डॉ. हमीद दाभोलकर यांच्याबरोबर राजू मानसिक आरोग्यावरील ‘मानसरंग’ या उपक्रमात सहभागी झाला आहे. तीव्र मानसिक आजारानं ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी मानसिक दिलासा देण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून प्रत्येक शुक्रवारी पुण्यात केला जातो. तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. तसंच राज्याबाहेरही राजूचं पाणी फाउंडेशनबरोबर काम सुरू आहे. 

संवादक म्हणून काम करताना आपण आग्रही भूमिका कधीच घेत नाही, असं राजू सांगतो. आपले सर्व मुद्दे अनाग्रही पद्धतीने मांडण्यावर त्याचा भर आहे. त्याच्या स्वतःच्या जगण्यात धर्मनिरपेक्षता, वैज्ञानिक दृष्टिकोन, समता ही लोकशाहीची तत्त्वं भिनली आहेत आणि तेच काम आपण आयुष्यभर करत राहणार, असं तो सांगतो. 



आज राजूसारखी माणसं आपल्या आसपास आहेत; पण तरीही या झगझगीत जगाच्या प्रकाशझोतात न येता अतिशय अदृश्यपणे प्रकाश पेरण्याचं काम करताहेत. त्या कामाच्या बदल्यात त्यांना हवाय एक निकोप समाज. म्हणूनच किशोरवयीन मुलांचं वा प्रौढांचं मानसिक आरोग्य असो, त्यांचे लैंगिकतेचे प्रश्न असोत वा आरोग्याच्या समस्या, त्यांची व्यसनं असोत वा त्यांच्या मनात उडणारा समतेविषयीचा गोंधळ, या सगळ्या प्रश्नांना सोडवण्यासाठी राजू संवादकाचं काम करतोय. तेच त्याच्या जगण्याचं ध्येय आहे. 

राजू हा जगन्मित्र आहे. त्याला कोणीही शत्रू नाही. ‘भारतीय संविधानाची जी भूमिका आहे, तीच माझी आहे. त्यातली कर्तव्यं पार पाडण्याची जबाबदारीही माझी आहे,’ असं तो म्हणतो. आपण आपलं काम करत असंच चालत राहणार, असं म्हणताना तो सांगतो - 

गीता, बायबल, कुराण सन्मानानं ठेवू घरात
घराबाहेर पडताना संविधान ठेवू मनात

(राजूचं आवडतं गीत त्याच्याच आवाजात ऐकण्यासाठी येथे क्लिक करा.)

संपर्क : राजू इनामदार
ई-मेल : rajuinamdar2012@gmail.com
मोबाइल : ९८२२९ १७५८०

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.)



 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZINBS
 Aise jagane mhanjecha jivan gane. Asecha gaath ja prakashbije rujveet ja.Jai Hind Rajudada2
 Super Rajudada2
 Raju Inamdar taught us a lot of things which guided personally me to take a stand in my life. He inspired me. Dialogue with him is always enriching experience.2
 Inspiring1
 सर तुमच्या कर्तुत्वाला सलाम... तुमच्या सारख्या माणसांचे विचार ऐकण्याची संधी प्रत्यक्षात मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो. तुमच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा !1
 राजू सर, तुमच्या संघर्षपूर्ण वाटचालीस सलाम, यापुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा1
 I am proud of my brother. Tujha ha khadtar pravasachi mi pan sakskidar Aahe.aani mala kayo angina Aahe. God bless you.2
 Khup abhimaan aahe mala mi tumchi mulgi aahe...tumchya ya pravasat tumhi je apar kashta kele aahet tyachi purn jaaniv mala aahe....aapan asch pudhe jomane kam karat raha...aamchi nehmi tumchya sobat aahot..1
 Raju dada, hats off for your work,
Asa manus kadhich asamadhani nahi rahu shakat, ani konti aapeksha hi n thevata niswarthi pane tumhi kam kartay.. God bless you.
Similar Posts
रुक जाना नहीं, तू कहीं हार के... बीए, एलएलबी झालेल्या, लग्न होऊन संसारात रुळलेल्या शारदा बापट नावाच्या एका स्त्रीनं आपल्या आईच्या सततच्या आजारपणाचं कारण शोधण्यासाठी चक्क वयाच्या पस्तिशीत डॉक्टर व्हायचं ठरवलं. रीतसर कॉलेज करून, असंख्य अडचणींना तोंड देत त्या डॉक्टर झाल्याही. त्याच दरम्यान त्या वैमानिकही झाल्या, कम्प्युटर्स-इलेक्ट्रॉनिक्स यांवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं
श्रीकृष्णाचं ‘अल्फा’ स्वप्न! आपला मुलगा ऑटिस्टिक आहे, हे समजल्यानंतरही पुण्यातील श्रीकृष्ण गोडबोले आणि त्यांच्या पत्नीनं वास्तव स्वीकारून वाटचाल करायचं ठरवलं. श्रीकृष्ण यांनी नोकरी सोडून स्वतःची फॅक्टरी सुरू केली आणि त्यात मानसिक विकलांग, अपंगांनाही कामाची संधी दिली. त्यांना जणू आपल्या कुटुंबातच सामावून घेतलं. अशा मुलांसाठी आणखीही बरंच काही करण्याची त्यांची इच्छा आहे
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए... ‘दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए’ असा विचार करणारे अनेक तरुण आज तयार होत आहेत, ही देशाच्या दृष्टीनं सुदैवाची गोष्ट आहे. पुण्याच्या मुळशी तालुक्यातल्या अंबडवेट गावचा संतोष भूमकर हा तरुण पोलीस अधिकारीही त्यापैकीच एक. स्वतः प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पोलिस उपनिरीक्षक बनलेल्या संतोषने आपल्या
किसी का दर्द मिल सके तो ले उधार... पुण्यातल्या कर्वेनगरमधलं नंदादीप हे पाळणाघर कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी चालवलं जातं. नंदा बराटे या महिलेनं १९ वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या पाळणाघराची कीर्ती आज सगळीकडे पसरलीय. मुलांना सांभाळण्यापासून शिस्त लावण्यापर्यंत आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यापर्यंत सगळ्या गोष्टी नंदाताई आपुलकीनं करतात. ‘अनवट

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language